ताजी बातमी

पत्रकारिता म्हणजे समाजाला दिशा देणारं पवित्र कार्य आहे. प्रसार माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहे. या अवस्थेमुळे माध्यमांमध्ये अगतिगता,अस्थिरतेच वातावरण, बाजारू व्यावसायिकता, काहीवेळा नीतिमूल्य न जोपासली जाणे हे घडत असले,  तरीही पत्रकारितेत सामाजिक बदलाची ताकद आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारी, अपुऱ्या माहितीवरून गैरसमज निर्माण करणारी सनसनाटी बातमीदारी न करता, पत्रकारांची भूमिका समाजाला दिशादर्शक आणि सामाजिक सुधारणा घडविणारी असावी. एखाद्या घटनेमागची वस्तुस्थिती समाजाला माहीत नसते. बऱ्याचदा कायद्याचा गैरफायदा घेतला गेल्यामुळे खऱ्या पिडीतावर एक प्रकारे अन्यायच होतो. अशा घटनांची चांगली-वाईट बाजू समाजासमोर आणण्याची आणि समाजात सौहार्दाचे वातावरण राखण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर असते. त्यामुळेच निकोप समाजाच्या उन्नतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असून लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनता यांच्यामध्ये ते समन्वय साधतात. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीजन्य बातमी देण्याकडे भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे उपस्थित होते. 
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या ६९ व्या वृत्तपत्र लेखाकडीने 'बदलती प्रसारमाध्यमे आणि माध्यमांची नैतिकता या विषयावर विचार व्यक्त करताना त्यांनी पत्रकारितेचे स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वरूप, १९९० नंतरची जागतिकीकरणानंतरची स्थिती, सद्यस्थिती, अपेक्षा आणि वास्तव यांचा ऊहापोह केला. ते पुढे असेही म्हणाले कि, आजही चांगली पत्रकारिता आहे, नाही असे नाही. पण ती नियमाला अपवाद आहे. चांगल्या पत्रकारितेस लागणारे धैर्य आज माध्यमांत अभावानेच दिसते. 
तर दिनेश गुणे  प्रसार माध्यमातील पत्रलेखनाची सद्यस्थिती" या विषयावर आपले विचार व्यक्त जाताना म्हणाले कि, सोशल मीडियावरील सामाजिक पत्रकारितेच्या वाढत्या प्रसारामुळे, ‘वर्तमानपत्रांतील वाचकांची पत्रे’ हा स्तंभ यापुढे दुबळा होत जाईल अशी भीती वाटते. हा कोपरा जिवंतच नव्हे तर भक्कमपणे जागा ठेवणे ही यापुढे मुद्रित माध्यमांची जबाबदारी राहणार आहे आणि पत्रलेखकाचीही जबाबदारी आहे.
कारण, पत्रलेखक ही पत्रकारितेच्या क्षेत्राची ‘तिसरी बाजू’ असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.पत्रलेखक हा व्यावसायिक पत्रकार नसला तरी पत्रकाराप्रमाणेच त्याचे डोळे-कान उघडे असतात, आसपासच्या, सर्वांनाच दिसणाऱ्या घटनांमधील ‘बातमी’मूल्य असलेले वेगळेपण टिपण्याची क्षमता व त्याचे विश्लेषण करून त्यातील वेगळेपण नेमके निवडून लोकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. एका अर्थाने, पत्रलेखक हा समाजमनाचा ‘आरसा’ असतो. 
म्हणूनच, बातम्या, विचार, मतमतांतरे आदी मजकुराने भरलेल्या वर्तमानपत्राचा एक दर्शनी कोपरा ही या पत्रलेखकांची मानाची जागा असते.  पत्रलेखक हा, सध्याच्या भाषेत, ‘व्हिसल ब्लोअर’च असला पाहिजे. आपण पत्रलेखक आहोत म्हणजे आसपासच्या अनेक अप्रिय बाबी अधोरेखित करणे हेच आपले कर्तव्य आहे याची जाणीव असलीच पाहिजे. या जाणिवेतून लिहिली गेलेली पत्रे प्रसिद्ध करणे हा वर्तमानपत्रासाठीही प्रतिष्ठेची व अभिमानाची बाब ठरली पाहिजे. लोकमानसाचा खराखुरा आरसा आपण दाखवितो, असा अभिमान वर्तमानपत्रासही वाटावा, असे वजनदार लेखन करणे ही पत्रलेखकाचीदेखील जबाबदारी आहे. त्यासाठी, डोळे, कान आणि मनही सदैव जागे असायलाच हवे.
याप्रसंगी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मनोहर आ साळवी आणि विजय ना कदम यांचा  सातत्याने ४ तपे करीत असलेल्या वृत्तपत्र लेखनाबद्दल 'जीवन गौरव पुरस्कार' 
देऊन सत्कार करण्यात आला. तर 'झी मराठी उत्सव नात्यांचा' या दिवाळी अंकाचे संपादक सुदेश हिंगलासपूरकर यांचा मनोरंजनकार का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी सूत्रसंचालन, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, अरुण खटावकर यांनी मानपत्राचे वाचन, तर दिगंबर चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत भाटकर,आत्माराम गायकवाड, सुनील कुवरे, नितीन कदम, केतन भोज, पंकज पाटील आदी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
Live Maharashtra - Hak Tumchi Sath Aamchi.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात