ताजी बातमी

महानगरपालिका उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया


समाजसेवी मान्यवर व संस्थांनी मिळून उचलला शस्त्रक्रियेचा आवश्यक खर्च, आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या फळविक्रेत्याच्या कुटुंबाला दिलासा


शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण, सुमारे ३० डॉक्टरांना मिळाले कौशल्याचे धडे


एकमेकांच्या मदतीसाठी हात सरसावले तर हितावह कार्य होवू शकते, याचे उत्तम उदाहरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली (पश्चिम) स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयाने सर्वांसमोर ठेवले आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरजू असलेल्या एका फळविक्रेत्याच्या ४ वर्ष वयाच्या व जन्मतः कर्णबधीर असलेल्या बालकावर कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे. विशेष म्हणजे महागड्या स्वरुपाच्या या शस्त्रक्रियेसाठी लागणारे उपकरण व इतर वैद्यकीय खर्च समाजसेवी मान्यवर व संस्था यांनी उचलला. एवढेच नव्हे तर, या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण देखील ३० डॉक्टरांनी पाहिले. 

कॉक्लिअर इम्प्लान्ट ही शस्त्रक्रिया कमी वयाच्या मूक-बधीर/ कर्णबधीर रुग्णांसाठी वरदान आहे. 'कॉक्लिअर' हे एक लहान स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते बसविल्यामुळे लहान मुलांमधील कर्णबधिरता दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ८ ते १० लाख रुपयांपर्यंत होवू शकतो व त्यासाठी निष्णात वैद्यकीय शल्यचिकित्सकांची, तज्ज्ञांची आवश्यकता असते.

महानगरपालिकेच्या कांदिवली (पश्चिम) स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात कार्यरत डी.एन.बी. शिक्षक डॉ. राजेश यादव आणि त्यांच्या सहकाऱयांनी कॉक्लिअर इम्प्लान्टचे महत्त्व जाणून ही शस्त्रक्रिया ह्या रुग्णालयात सुरू करण्याबाबत विशेष प्रयत्न केले आहेत. आर्थिकदृष्ट्या गरीब एका शेतकरी कुटुंबातील फळविक्रेत्याचा चार वर्षाचा मुलगा जन्मत: मूक-बधीर असल्याचे एका वर्षापूर्वी संबंधित कुटुंबाच्या लक्षात आले. या बालकाच्या उपचारांकरीता त्याच्या आई-वडिलांनी खूप ठिकाणी प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या अडचणींमुळे मोठ्या रुग्णालयांत जाणे परवडत नसल्याने त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारांकरीता या बालकाला आणले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी कॉक्लिअर इम्प्लान्ट करण्याविषयी सुचविले.

मात्र, या शस्त्रक्रियेचा उपकरण व इतर खर्च देखील परवडणार नसल्याने या कुटुंबाने सांगितले. त्यांची एकूणच परिस्थिती लक्षात घेता आणि या लहानग्याला श्रवणशक्ती देण्याचा निर्धार करुन रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाऊंडेशन, डॉ. भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांनी मिळून आर्थिक पाठबळ उभे केले. त्यानंतर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कॉक्लिअर इम्प्लान्टची पहिली शस्त्रक्रिया दिनांक ८ जुलै २०२२ रोजी यशस्वीरित्या पार पडली. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांत प्रथमच ही शस्त्रक्रिया घडलेली आहे, त्यादृष्टीने ही वैशिष्ट्यपूर्ण घटना ठरली आहे.

डॉ. राजेश यादव यांच्या प्रयत्नाने, प्रख्यात कान-नाक-घसा तज्ज्ञ पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांनी ही शस्त्रक्रिया केली. यासाठी त्यांना डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. संगमलाल पाल, डॉ. मृण्मयी यांनी सहाय्य केले. रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड आणि डॉ. ललित सेठ हे देखील यावेळी उपस्थित होते. रुग्णालयातील कान-नाक-घसा शस्त्रक्रियागृहातून या शस्त्रक्रियेचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले, ज्याचा लाभ ३० डॉक्टरांनी घेतला. भविष्यात अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याच्या दृष्टीने कौशल्य आत्मसात करता यावे म्हणून ही प्रक्षेपणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती.

दरम्यान, कॉक्लिअर इम्प्लान्ट झालेल्या बालकाची प्रकृती स्थिर असून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल बालकाच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) प्रतिमा पाटील व प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. (श्रीमती) विद्या ठाकूर यांनी सांगितले की, उपनगरीय रुग्णालयात डीएनबी अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक झाल्याने उपनगरीय रुग्णालयात गुंतागुंतीच्या व जोखमीच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात सेवा देणे शक्य होवू लागले आहे. याचा रुग्णांना तर फायदा होतो, तसेच महानगरपालिकेच्या प्रमुख / मोठ्या रुग्णांवरील वरील वैद्यकीय सेवेचा ताण कमी होण्यास देखील मदत होणार आहे. कोविड नंतरच्या कालावधीत महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली आखलेल्या धोरणामुळे महानगरपालिकेची आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी असे बदल प्रत्यक्षात येवू लागले आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालयातील ह्या शस्त्रक्रियेच्या यशामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. गरजू कुटुंबातील रुग्णांवर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया नियमित स्वरुपात करण्याची व त्याकरिता नाक-कान-घसा शल्यचिकित्सक, वाचा उपचार तज्ज्ञ व समुपदेशक (स्पीच थेरपिस्ट व काउन्सिलर) ह्यांची सर्वसमावेशक यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करणार आहे. महानगरपालिकेच्या सहा उपनगरीय रुग्णालयांमध्ये डीएनबी सुरु करण्यात येणार असून या सहाही रुग्णालयांमध्ये श्रवणोपचार तज्ज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, गोवंडीचे पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय या सहा रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात