ताजी बातमी

नवी मुंबईचे निसर्गसंपन्न आकर्षण केंद्र म्हणून नावाजल्या जाणा-या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील आकाराने अतिशय मोठ्या विस्तृत जलाशयामध्ये आसपासच्या भागातील सांडपाणी येत असल्याने तेथील पाणी दूषित होत असल्याचे लक्षात घेत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागास दिले होते.


     त्यास अनुसरून तांत्रिक पाहणी करण्यात येऊन त्याठिकाणी मलनि:स्सारण वाहिनीची व्यवस्था करण्याचे तसेच जलाशयाकडे जाणा-या सांडपाण्यास प्रतिबंध करण्यासाठी जलउदंचन केंद्र बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. या कामाची आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी करीत 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त शहर अभियंता श्री.मनोज पाटील, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे व संबंधित अभियंते उपस्थित होते.


     ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या जलाशयात भरती – ओहोटीनुसार येणारे जाणारे खाडीचे पाणी असावे व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये याची काळजी घेतली जात असून त्याकरिता ज्वेल ऑफ नवी मुंबई पासून सीवूड मॉलपर्यंत 80 मिमी व्यासाची 560 रनींग मीटर लांब मलनि:स्सारण वाहिनी टाकण्यात आलेली आहे. याकरिता 3 द.ल.लि. क्षमतेचे प्रीफॅब्रिकेटेड पंपीग स्टेशन उभे करण्यात आलेले आहे. ही प्रणाली व्यवस्थित रितीने कार्यान्वित राहण्याच्या दृष्टीने 29 चेंबर्स बनविण्यात आलेले आहेत. तसेच करावे होल्डींग पाँड, तांडेल उद्यान, बामणदेव मैदान आणि अमृतानंदमयी मार्ग अशा 4 ठिकाणी स्क्रिनींग व मॅन्युअल गेट बसविले जात आहेत.


      ही सर्व कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच या कामाची बारकाईने पाहणी करीत आयुक्तांनी सद्यस्थिती जाणून घेतली. या जलाशयाच्या पाणथळ भागात सध्या काही प्रमाणात पक्षी दिसत असून येथील पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ राहून पक्षांचा अधिवास वाढेल व ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल अशाप्रकारे कार्यवाही केली जात आहे. जलाशयात जाणा-या सांडपाण्याला प्रतिबंध घातला गेल्याने ज्वेल ऑफ नवी मुंबईचा जलाशय अधिक स्वच्छ होणार असून येथे येणा-या नागरिकांसाठी ती अधिक आनंददायी बाब असणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात