ताजी बातमी

पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले असून त्यामधील महत्वाचा भाग असलेल्या वृक्षारोपण व संवर्धनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. मागील दोन वर्षात 2 लक्ष 22 हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. सदर वृक्षारोपणाचा महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी बारकाईने आढावा घेत आगामी एक महिन्याच्या पावसाळापूर्व कालावधीत मियावाकी पध्दतीने नियोजित 60 हजार वृक्षरोपांची लागवड पूर्ण करावी तसेच या वर्षात इतर 20 हजार वृक्षरोपांची लागवडही नियोजनबध्द रितीने व्यवस्थितरित्या पूर्ण करावी असे निर्देश उद्यान विभागाला दिले.


     सन 2021 वर्षात शहरात 1 लाखाहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, ‘ग्रीन यात्रा’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोदयानात 40 हजार वृक्षांचे मियावाकी पध्दतीचे अतिशय समृध्द शहरी जंगल सीएसआर निधीतून निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय मोरबे धरण प्रकल्पस्थळी आधीच्या 1 लक्ष वृक्षरोपांमध्ये 40 हजार वृक्षरोपांची भर घालण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त शहरात इतर ठिकाणी 20 हजाराहून अधिक वृक्षलागवड करण्यात आलेली आहे.


     सन 2022 वर्षामध्येही हाच वेग कायम राखत शहरात 7 ठिकाणी 1 लाख 4 हजारपेक्षा अधिक वृक्षरोपांची मियावाकी पध्दतीने लागवड करण्यात आलेली असून यामध्ये निसर्गोद्यानातील मियावाकी शहरी जंगलात आधीच्या 40 हजार वृक्षरोपांत आणखी 20 हजार देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची भर घालण्यात आलेली आहे. तसेच विविध ठिकाणी 30 हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. मोरबे धरण प्रकल्पस्थळीही 40 हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे.


     मियावाकी पध्दतीची वृक्षलागवड ही पावसाळा व्यतिरिक्त कालावधीत करावी लागते, ही बाब लक्षात घेऊन नियोजित केलेली ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे अधिक 48 हजार वृक्ष लागवड तसेच नागा गणा पाटील उद्यान, सेक्टर 15, सीबीडी, बेलापूर येथे 8 हजार वृक्ष लागवड अशी उर्वरित 56 हजार मियावाकी पध्दतीची वृक्षलागवड पावसाळ्यापूर्वी मे महिन्यातच पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.


     विशेष बाब म्हणजे यावर्षी ज्वेल ऑफ नवी मुंबई या एकाच ठिकाणी मियावाकी पध्दतीने 1 लाख वृक्षरोपांच्या शहरी जंगल निर्मितीचे नियोजन करण्यात आले असून हा सद्यस्थितीतील देशातील सर्वात मोठा मियावाकी पध्दतीचा शहरी जंगल प्रकल्प असणार आहे. या 1 लक्ष वृक्षरोपांपैकी 68 हजाराहून अधिक वृक्षरोपांची लागवड पूर्ण करण्यात आलेली असून याबाबतची विस्तृत माहिती घेत आयुक्तांनी उर्वरित वृक्षलागवडीचे काम मे महिन्यात नियोजनबध्द रितीने पूर्ण करण्याचे निर्देश उद्यान विभाग व ग्रीनयात्राच्या प्रतिनिधींना दिले.


     ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे साकारल्या जात असलेल्या मियावाकी स्वरूपाच्या शहरी जंगलामधून फिरण्याचा अनुभव नागरिकांना घेता यावा यादृष्टीने त्याठिकाणी पदपथ तयार करण्यात येत असून या पदपथांचे तसेच नागरिकांच्या वापराकरिता करण्यात येणा-या ध्यान केंद्राचेही काम जलद पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. 


     मियावाकी पध्दतीने लावण्यात येणारी सर्व वृक्षरोपे देशी प्रजातींची असून त्यामध्ये करवंद, कढीपत्ता, तगर, अडुळसा, निंब, खैर, बेल, लिंब, कांचन, आपटा, उंबर, खैर, अशोक, बदाम, बोर, अंजन, बहावा, कोकम, जांभूळ, मोह, बकुळ, करंज, रिठे, काजू, चिंच, आवळा, वड, पिंपळ, सोनचाफा, आंबा, कदंब, साग, सरस अशा 60 हून अधिक देशी वृक्ष प्रजातींचा समावेश आहे.


     मियावाकी पध्दतीने लावण्यात येणा-या वृक्षरोपांची वाढ सर्वसाधारण वृक्षलागवडीतील रोपांपेक्षा कितीतरी पट अधिक वेगवान असून कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानातील अनुभव लक्षात घेता लागवडीच्या वेळी 1.5 ते 2 फूटांची असलेली वृक्षरोपे 12 महिन्यांच्या कालावधीतच 15 फूटापर्यंत उंच झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे फळा-फुलांनी समृध्द असलेल्या या झा़डांमुळे तेथील जैवविविधतेही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.


     नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ग्रीन यात्रा संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणारे मियावाकी शहरी जंगल निर्मितीचे काम संपूर्णपणे सीएसआर निधीतून करण्यात येत असल्याने महानगरपालिकेची कोट्यावधी रुपयांची बचत झाली आहे व होत आहे. पूर्णपणे सीएसआर निधीतून हा खर्च होत असल्याने यासाठी महानगरपालिकेचा कोणताही खर्च झालेला नाही तसेच या झाडांचे 3 वर्षांचे संगोपन व संवर्धनही संस्थेमार्फत केले जात आहे. त्यासाठीही महानगरपालिका कोणत्याही प्रकारचा मोबदला संस्थेस देत नाही. त्यामुळे महानगरपालिकेचा काहीही खर्च न होता या मियावाकी शहरी जंगल निर्मितीमुळे नवी मुंबईच्या पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन होत आहे.


     विशेष म्हणजे वृक्षरोपांच्या वाढीसाठी महानगरपालिकेच्या अत्याधुनिक सी टेक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाणी वापरले जात असल्याने पिण्याच्या पाण्याचीही बचत होत आहे.


     मियावाकी पध्दतीने लागवड केलेली झाडे नियमित वृक्षरोपांपेक्षा झपाट्याने वाढत असल्यामुळे या मियावाकी शहरी जंगलांमध्ये विविध पक्षी, प्राणी यांचा अधिवास वाढून नवी मुंबईच्या जैवविविधेतही लक्षणीय भर पडत आहे. वृक्षारोपण, संवर्धन याचा आढावा घेतानाच आयुक्तांनी आणखी काही जागा शोधून त्याठिकाणीही मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करावी अशा सूचना उद्यान विभागास दिल्या.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात