ताजी बातमी

बाबासाहेबांची आणि त्यांच्या जीवन कार्याची उत्तम ओळख अनुभवायला मिळणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे आजच्या आणि उद्याच्या पिढ्यांसाठी फार मोठा ठेवा आहे अशा शब्दात अभिप्राय देत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी स्मारकामधील ग्रंथालय हे अभ्यासकांसाठी एक मोठी पर्वणी असल्याचे मत व्यक्त करीत ही वास्तू बघून धन्य झालो अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.


     सेक्टर 15 ऐरोली येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सपत्नीक भेट देत तेथील विविध सुविधा दालनांना भेट देऊन पाहणी केली व मौलीक सूचना केल्या. यावेळी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी त्यांना विविध सुविधांची तपशीलवार माहिती दिली.


     नवी मुंबई महानगरपालिकेने स्मारक उभारताना त्यात अत्याधुनिक सुविधा निर्माण करीत विशेषत्वाने समृध्द अशी ग्रंथालय सुविधा निर्माण करून वाचक, संशोधकांसाठी एक विचार प्रवर्तक सर्वंकष दालन उभे केल्याबद्दल ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी महानगरपालिकेचे कौतुक केले.


     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची भव्यतम वास्तू व त्यामधील सुविधा उत्तम दर्जाच्या असून बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन चरित्र चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. तसेच आज माणसाला सर्वाधिक गरज मन:शांतीची असून याठिकाणी ध्यानकेंद्राची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांचे व बाबासाहेबांबद्दलचे संपूर्ण साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आलेले असून बाबासाहेबांचे विचार ग्रंथ वाचनातून जाणून घेण्यासाठी किंवा त्यावर संशोधन करण्यासाठी उभारण्यात आलेले ग्रंथालय अत्यंत उपयोगी असल्याचे मत डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.


     आजच्या काळात अशा प्रकारच्या वैचारिक दिशा देणा-या स्मारकांची आवश्यकता असल्याचे विषद करीत डॉ. अनिल काकोडकर यांनी या स्मारक निर्मितीमध्ये मौलीक योगदान देणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसह सर्व संबंधित घटकांचे अभिनंदन केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात