ताजी बातमी

तालुकास्तरासह महत्वाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करा

नादुरुस्त साठवण, पाझर तलावांची तातडीने दुरुस्ती करुन घ्या

 जालना:-  मान्सुन कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी गावपातळी तसेच तालुका पातळीवरील परिपुर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे येत्या आठ दिवसांमध्ये सादर करावेत. प्रत्येक विभागाला देण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

  मान्सुन 2022 पुर्वतयारी आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधकारी डॉ. राठोड बोलत होते.

  जिल्हाधिकारी श्री. राठोड म्हणाले की, यावर्षी 96 ते 104 टक्के पावसाचा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.  त्यामुळे या काळात जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे. सर्व तहसीलदार कार्यालये, पोलीस स्टेशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महावितरणच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करावा. सर्व नियंत्रण कक्ष नियमितपणे कार्यरत राहणे आवश्यक असून त्याबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. नियंत्रण कक्ष बंद असल्याचे आढळ्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तालुका व गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करुन त्यांच्या बैठका घेण्यात याव्यात. पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी निवाऱ्याच्या व्यवस्थेबरोबरच त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अन्नधान्य, औषधी, पुरेशा प्रमाणात पाणी आदी व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. 

  जिल्ह्यात असलेल्या विविध पाणी साठवण प्रकल्पांसह साठवण तलाव, पाझर तलाव आदींची पहाणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असेल ती तातडीने करुन घेण्यात यावी.  जिल्ह्यात असलेल्या पाच प्रमुख नद्यांच्या पूररेषा आखणीचे काम गतीने पुर्ण करण्यात यावे. आपत्तीच्या काळामध्ये विद्युत पुरवठा तसेच दुरध्वनी सेवा अखंडित सुरु राहील याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. पूरप्रवण, तलाव क्षेत्रामध्ये गावशोध व बचाव पथक, पूर्वसुचनागट, पट्टीच्या पोहणाऱ्या लोकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. जिल्ह्यातुन वाहणाऱ्या नदीचे, नाल्यांचे नैसर्गिक पात्र अतिक्रमणामुळे अरुंद झाले असेल तर अशा ठिकाणची अतिक्रमणे तातडीने काढावीत. जिल्ह्याच्या शहरी भागातील गटार व्यवस्था, नालेसफाई व नैसर्गिकपणे वाहणाऱ्या तसेच सांडव्यावरुन वाहणाऱ्या पाण्याबरोबरच पावसाच्या पाण्यात अडथळा निर्माण करणारी झाडे, झुडपे काढून पाण्याचा निचरा योग्यरितीने होईल, याबाबतही उपाययोजना करण्यात याव्यात. आपत्ती आल्यानंतर त्याचा मुकाबला कशा पद्धतीने करावयाचा यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर मॉकड्रील आयोजित करण्यात याव्यात. बचाव कार्यासाठी आवश्यक असणारे साहित्य सुस्थितीमध्ये असल्याची खातरजमा करण्याच्या  सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. 

  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव नेटके यांनी पॉवरपाँईटच्या माध्यमातुन आपत्तीच्या काळात कोणत्या विभागाने काय कार्यवाही करावयाची आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती दिली.

  बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार यांच्यासह जिल्हयातील यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात