ताजी बातमी

शहर विभागातील ७०, पूर्व उपनगरातील १०४ तर पश्चिम उपनगरातील १६३ इमारतींचा समावेश

 महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इमारतींची यादी उपलब्ध

संबंधित रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावेः महानगरपालिकेचे आवाहन


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या एकूण ३३७

इमारतींची यादी महानगरपालिकेने जाहीर केली असून ही यादी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर उपलब्ध आहे. या ३३७ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ७०, पूर्व उपनगरे विभागात १०४ तर पश्चिम उपनगरे विभागात १६३ इमारती यादीत समाविष्ट आहेत. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱया नागरिकांनी खबरदारीचा उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आणि उप आयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) श्रीमती चंदा जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळापूर्व विविध कामे आणि उपाययोजना केल्या जातात. नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्ती यांच्यासोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करुन त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. यंदादेखील महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त महानगरपालिका  आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरातील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले. तपासणीअंती काल (दिनांक २५ एप्रिल २०२२) अंतिम केलेली सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in यावर ‘इतर संकेतस्थळं / Relevant Websites’ या सदरामध्ये ही यादी नागरिकांसाठी उपलब्ध आहे. 

 

मुंबई शहर विभागात ७० इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या ७० इमारतींमध्ये ए विभाग ४, बी विभाग ४, सी विभाग १, डी विभाग ४, ई विभाग १२, एफ/दक्षिण विभाग ५, एफ/उत्तर विभाग  २६, जी/दक्षिण विभाग ४ आणि जी/उत्तर विभाग १० अशा विभागनिहाय इमारतींचा समावेश आहे. 


पश्चिम उपनगरांचा विचार करता १६३ पैकी एच/पूर्व विभागात ९, एच/पश्चिममध्ये ३०, के/पूर्व  विभागात २८, के/पश्चिम विभागात ४०, पी/दक्षिण विभागामध्ये ३, पी/उत्तर विभागात १३, आर/दक्षिण विभागात १०, आर/मध्य विभागामध्ये २२ आणि आर/उत्तर विभागात ८ इमारती सी-१ श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत. 


पूर्व उपनगरातील १०४ इमारतींपैकी एम/पश्चिम विभागात १६, एम/पूर्व विभागामध्ये १, एल विभागात १२, एन विभागात २०, एस विभागात ६ आणि टी विभागात ४९ इमारतींचा समावेश आहे. 


या अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱया रहिवाशांनी नागरिकांनी त्वरित निवासस्थान रिक्त करावे, तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तसेच सदर इमारत स्वतःहून मालकांनी निष्कासित करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 


वास्तव्यास असणारी इमारत ढोबळ मानाने अतिधोकादायक झाली आहे, याची काही प्राथमिक लक्षणे आढळून येतात. ती पुढीलप्रमाणेः-  

इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.

इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.

-इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.

इरतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे. 

इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसणे. 

इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे. 

इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा / भेगा दिसणे.

स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्याचे दिसणे. 

इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे.

यापैकी कोणतीही तत्सम लक्षणे दिसून येत असतील, अशा इमारतीतील नागरिकांनी आपली इमारत त्वरित रिक्त करणे आवश्यक आहे. तसेच आजुबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना देखील सतर्क राहण्याबाबत अवगत करावे. 

बृहन्मुंबई क्षेत्रातील ज्या इमारती ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीकरीता वापरात आहेत, अशा इमारतींची महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत असलेल्या संरचनात्मक अभियंत्यांद्वारे परीक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. सदर यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ / २२६९४७२५ / २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची हानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे, ही नागरिकांची देखील जबाबदारी असून त्या कामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात