ताजी बातमी

२ शस्त्रक्रिया गृहांचे लोकार्पण आणि एका सभागृहाचे देखील मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण


लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


आपले काम हे समर्पित भावनेने, एकाग्रतेने आणि मनापासून करा, ज्यामुळे त्या कामातून तुम्हाला अधिक अधिक समाधान मिळेल. त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या वाट्याला येणारे छोटे-छोटे आनंद देखील आवर्जून घ्या, असा संदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी दिला. 

ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या ७५व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कु-हाडे, उपायुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. नीलम आंद्रादे, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कल्पना मेहता, केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांच्यासह रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी मंडळी उपस्थित होती.

आजच्या वर्धापन दिन सोहळ्यादरम्यान लोकमान्य टिळक रुग्णालयात नव्याने उभारण्यात आलेल्या दोन शस्त्रक्रियागृहांचे लोकार्पण आजच्या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त महापालिका आयुक्त महोदयांच्या हस्ते करण्यात आले. यापैकी एक शस्त्रक्रिया गृह हे अवयव प्रत्यारोपणासाठी; तर दुसरे शस्त्रक्रियागृह पोटाच्या विकारांंशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यासाठी उपयोगात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नवीन सभागृहाचे लोकार्पण देखील आजच्या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आज संपन्न झालेल्या कार्यक्रमादरम्यान मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीदरम्यान श्री. काकाणी यांनी त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून केलेल्या कार्याबद्दल विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच प्राध्यापक व विद्यार्थी वर्गाने विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी समर्पक उत्तरे देत त्यांचे समाधान केले.

आजच्या कार्यक्रमातील पहिल्या सत्रादरम्यान सुप्रसिद्ध ओबेसिटी सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांनी लठ्ठपणा विषयक व्यवस्थापन आणि बॅरिॲट्रिक सर्जरी याबद्दल सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणासह उपस्थितांना दिली.

यानंतरच्या सत्रामध्ये डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचे महत्त्व आणि मधुमेहासारख्या आजारावर मात करण्यासाठी आहारात, आहाराच्या प्रमाणात आणि आहाराच्या वेळेत कोणते बदल करावेत याबाबत विविध उदाहरणांचा सविस्तर मार्गदर्शन उपस्थितांना केले.

आजच्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या ५ पुस्तकांचे प्रकाशन अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले. ज्यामध्ये संसर्गजन्य रोग, आरोग्य दिन विशेष, पावसाळ्यातील आजार, असंसर्गजन्य रोग आणि 'महिला व बाल आरोग्य'; या पाच पुस्तकांचा समावेश आहे.

आजच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉक्टर वृंदा कोलते यांनी केले. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी 'रंगतरंग' या संगीत विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात