ताजी बातमी

प्रायोगिक चाचणी यशस्वी यापुढे जे रस्ते कामांसाठी बंद होतील, त्यांची माहिती गुगल ला अधिकृतपणे कळविली जाणार, ज्यानंतर २४ तासात सदर माहिती गुगल नकाशांवर अद्ययावत होणार 


नागरिकांच्या सुविधेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तंत्रज्ञान खात्याचा पुढाकार


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात भ्रमंती करत असताना आजकाल अनेक जण गुगल मॅपचा वापर करतात. मात्र, अनेकदा विविध दुरुस्ती कामांसाठी रस्ते बंद असल्यास त्याची माहिती गुगल मॅप वर अद्यावत नसते, ज्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष त्या रस्त्याजवळ गेल्यानंतरच सदर रस्ता बंद असल्याचे कळते. ही बाब लक्षात घेऊन व नागरिकांची अशी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे आता एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाअंतर्गत आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे रस्ते दुरुस्तीकामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची माहिती अग्रीम स्वरूपात गुगल ला अधिकृतपणे कळविण्यात येणार आहे. यामुळे 'गुगल मॅप' वर रस्ता शोधतेवेळी सदर रस्ता बंद असल्याचे नागरिकांना सहजपणे कळणार आहे. तसेच बंद असलेल्या रस्त्याला पर्यायी मार्ग देखील गुगल मॅप  द्वारे दर्शविला जाणार आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त श्री शरद उघडे यांनी दिली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना श्री. शरद उघडे यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जे रस्ते विविध दुरुस्ती कामांसाठी किंवा स्थापत्य कामांसाठी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार बंद असतील, त्यांची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे अधिकृतपणे गुगल ला लेप्टन या संस्थेच्या सहकार्याने कळविण्यात येणार आहे. ही माहिती कळविल्यानंतर त्या पुढील २४ तासांमध्ये ही माहिती गुगल मॅप वर अद्ययावत करण्यात येणार आहे. या अनुषंगाने चाचणी स्वरुपात दक्षिण मुंबईतील 'गणपतराव कदम मार्ग' येथे सुरू असलेल्या कामांची माहिती 'गुगल'ला कळविण्यात आली होती. ज्यामुळे आता सदर ठिकाणी लाल रंगातील ठळक ठिपक्यांची रेषा दिसत आहे. या रेषेवर क्लिक केल्यानंतर सदर रस्ता बंद असल्याचा कालावधी देखील दिसत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर, आता याच धर्तीवर भविष्यात जे रस्ते बंद असतील, त्यांची माहिती गुगल ला कळविण्यात येणार आहे. 

भविष्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम एम आर डी ए), वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर रस्त्यांची माहिती देखील गुगल मॅप वर उपलब्ध करून देण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नियोजन आहे. तर यापूर्वी कोविड -१९ या साथ रोगाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कंटेनमेंट झोन ची (विलगिकरण क्षेत्र) माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व 'गुगल'च्या सहकार्याने नागरिकांना गुगल मॅप वर उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान खात्याद्वारे कळविण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात