ताजी बातमी

अवघ्या ५ दिवसात तब्बल ११ हजार ५०० पेक्षा अधिक नवीन प्रवेश


अद्ययावत आणि सुसज्ज शैक्षणिक सुविधांमुळे देशभरात नावाजलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अर्थात मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून यंदा १ लाख नवीन प्रवेश करण्याचे ध्येय शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यासाठी मिशन ऍडमिशनः एकच लक्ष्य – एक लक्ष ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक १८ एप्रिल २०२२ पासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यापासून आजमितीस अवघ्या ५ दिवसात तब्बल ११ हजार ५४९ नवीन प्रवेश निश्चित झाले आहेत.  

राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नावीण्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चौफेर प्रगतीची संधी देणाऱया उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी शाळांच्या इमारती, अभ्यासक्रम, इतर शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर उपक्रम या सर्वंच बाबींमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून महानगरपालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ लागली आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार आणि सह आयुक्त (शिक्षण) श्री. अजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने यंदा मिशन ऍडमिशनः एकच लक्ष्य – एक लक्ष या मोहीम अंतर्गत किमान १ लाख नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षण अधिकारी श्री. राजेश कंकाळ, श्री. राजू तडवी व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी तसेच शिक्षकवर्ग ही मोहीम राबवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा संचालित केल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१५० शाळांमध्ये मिळून सद्यस्थितीत ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही विद्यार्थी संख्या गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २९ हजारने वाढली आहे. महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता पाहून आपल्या पाल्यांना महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे ओढा वाढल्याचे यातून स्पष्ट होते. 

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिनांक १८ एप्रिल २०२२ पासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रामुख्याने बालवाडी (नर्सरी) ते पहिली, दुसरी वर्गांमधील प्रवेश पालकांकडून सध्या निश्चित केले जात आहेत. जसेजसे विविध शाळांमधील वेगवेगळ्या इयत्तांचे निकाल लागतील, तसेतसे मुंबई पब्लिक स्कूलमधील इतर इयत्तांमधील प्रवेश देखील वाढीस लागतील. पहिल्या पाच दिवसांमध्येच सुमारे ११ हजार ५४९ प्रवेश निश्चित झाले असल्याने १ लाख नवीन प्रवेशाचे लक्ष्य गाठले जाईल, याची प्रशासनाला खात्री आहे. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक ३१ जुलैपर्यंत महानगरपालिका शाळांमधील खात्रीशीर नियमित प्रवेश प्रक्रिया सुरु राहील.


महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी, सर्व शाळांचा सामाजिक दर्जा एकसमान गुणवत्तापूर्ण रहावा, याकरिता सर्व शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ या नावाने ओळखल्या जात आहेत. या शाळांमधून दिल्या जाणाऱया गुणवत्तापूर्ण शिक्षणातून ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचून देशाचे भावी आधारस्तंभ सुसंस्कृत व्हावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. बालवाडी (नर्सरी) ते दहावीपर्यंत निःशुल्क शिक्षण देणाऱया महानगरपालिका शाळांमध्ये अनुभवी व उच्चशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. महानगरपालिकेच्या शाळांमधील दहावी (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षेचा निकाल सन २०१९ च्या ५३.१४ टक्के निकालावरून सन २०२० मध्ये थेट ९३.२५ टक्के व सन २०२१ मध्ये १०० टक्के निकालात परिवर्तित झाला आहे, यावरुन शिक्षण विभागाची झेप लक्षात येते. 

एकूण ८ भाषांमधून शिक्षण देणारी व स्वतंत्र संगीत, कला, कार्यानुभव, स्काऊट- गाईड विभाग असणारी ही देशातील एकमेव महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबईची ओळख आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱया सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. 

महानगरपालिकेच्या शालेय इमारती आता अद्ययावत, सुसज्ज आणि आकर्षक अशा करण्यात आल्या आहेत. शाळांची स्वच्छता व सुरक्षा नियमितपणे होण्यासाठी हाऊसकिपिंग सेवा घेण्यात आली आहे. शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण दिले जाते. दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. वर्गखोल्या (क्लासरूम) डिजिटल होत आहेत. क्रीडांगणे अद्ययावत करण्यात येत आहेत. तसेच वाचनालयांच्या पलीकडे जाऊन संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा (ऍस्ट्रॉनॉमी लॅब), भाषा प्रयोगशाळा, टिंकरींग लॅब, लघू विज्ञान केंद्र, विज्ञान कुतूहल भवन (विज्ञान संग्रहालय) सुरु करण्यात आले आहेत. अद्ययावत डेस्क- बेंच, ध्वनिक्षेपण यंत्रणा यामुळे विद्यार्थी सुलभ पद्धतीने शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात. शालेय पोषण आहार तसेच शालेयपयोगी साहित्य, गणवेश, बूट व मोजे, वह्या, रेनकोट/छत्री, स्कूलकीट व सँडल आदी मिळून सुमारे २७ शालेय वस्तू विनामूल्य पुरवले जातात. विद्यार्थ्यांना बेस्ट बसमधून मोफत प्रवास करण्याची योजना राबवली जाते. इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता दिला जातो. सॅनिटरी नॅपकिन व व्हेंडिंग संयंत्र, कोविड - १९ साठी आरोग्यविषयक आवश्यक साहित्याचा पुरवठा अशा एक ना अनेक सुविधा पूर्णत: मोफत देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे.


महानगरपालिका माध्यमिक शाळेतून शिक्षण घेऊन माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्वप्रथम येणाऱया २५ विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी किमान रुपये २५,००० किंवा ते शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमाचो शैक्षणिक शुल्क अर्थसहाय्य म्हणून देण्यात येत आहे. सद्यस्थितीत ५० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच माध्यमिक शालांत (एस.एस.सी. बोर्ड) परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱया प्रत्येक विद्यार्थ्यांला रोख रुपये ५,०००/- चे पारितोषिक देऊन गौरविण्यात येत आहे.  

  

अन्य बोर्डातील शाळांकडे पालकांचा वाढता कल विचारात घेऊन महानगरपालिकेने सी.बी.एस.ई. बोर्डच्या ११, आय.सी.एस.ई. बोर्डची १ शाळा सुरु केली आहे. या शाळांना दिल्ली बोर्डाची संलग्नता प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात आय. बी. (I. B. - International Baccalaureate) बोर्डची शाळा सुरू केली जाणार आहे.त्यासोबतच, माटुंगा येथील एल. के. वाघजी महानगरपालिका शालेय इमारतीमध्ये केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नीत आय.जी.सी.एस.ई. (IGCSE - International General Certificate of Secondary Education ) बोर्डची शाळा सुरू होत आहे. अशा या १४ शाळांमध्ये मिळून जवळपास ८०० प्रवेश जागा असून त्यासाठी मोठ्या संख्येने मिळणारा प्रतिसाद हे सर्व प्रवेश निश्चित आहेत. 

अन्य बोर्ड व आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू करत असताना मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी सर्व भाषिक विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा, साहित्यिकांच्या मुलाखती, निवडक विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिकांचे लेख असणारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ या नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येत असते. याचा परिणाम मराठी व अन्य प्रादेशिक भाषांमधील शाळांच्या पटसंख्येत देखील वाढ झाल्याचे दिसून येते. मराठी भाषेसह अन्य सर्व प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देणाऱया शाळांच्या दर्जा उन्नतीसाठी सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या शाळांमधील शिक्षकांना नामांकीत संस्थेतील तज्ज्ञांद्वारे ‘स्पोकन इंग्रजी’ चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत देण्यात येत असलेल्या मोफत व दर्जेदार शिक्षणाच्या निरनिराळ्या सुविधा तसेच राबविण्यात येत असलेले विविधांगी उपक्रम याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी ‘मिशन ऍडमिशन,  एकच लक्ष्य - एक लक्ष’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला पालकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्यांना सर्वोत्कृष्ट असे शिक्षण देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असून तो यशस्वी करण्याचा निर्धार महानगरपालिका प्रशासनाने केला आहे, असे सहआयुक्त (शिक्षण) श्री. अजीत कुंभार यांनी सांगितले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात