ताजी बातमी

मुंबईच्या धर्तीवर चंदीगड मध्ये देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित घन कचरा व्यवस्थापन राबविणार 

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. श्री. इक्बाल सिंह चहल यांची चंदीगडच्या महापौर श्रीमती सर्बजीत कौर आणि मान्यवरांनी भेट घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाची घेतली माहिती!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे राबविण्यात येत असलेले विविध प्रकल्प हे चंदीगड सारख्या शहरांना निश्चितच मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत, असे कौतुकोद्गार चंदीगडच्या महापौर श्रीमती सर्बजीत कौर यांनी काढले. त्या आज घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या विविध प्रकल्पांना भेट दिल्यानंतर महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह यांच्याशी संवाद साधताना बोलत होत्या.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी चंदिगड महानगरपालिकेच्या महापौर, आयुक्त आणि मान्यवरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती दिली. यादरम्यान त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रशासकीय कार्यपद्धती, मुंबई महानगरपालिका अधिनियमाची वैशिष्ट्ये, व्यवस्थापन, मनुष्यबळ, विविध कामांचा आवाका इत्यादींची माहिती दिली. तसेच मुंबईकर नागरिकांना बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांची माहिती देखील मनपा आयुक्त डॉक्टर चहल यांनी मान्यवरांना दिली. यामध्ये प्रामुख्याने पालिकेची पाणी पुरवठा यंत्रणा, सागरी किनारा रस्ता, उद्याने, वैद्यकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, कोविड काळात महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अविरतपणे व तत्परतेने केलेली कामे यांचीही माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

याप्रसंगी चंदीगड महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अनिंदिता मित्रा यांनी आवर्जून नमूद केले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे घन कचरा व्यवस्थापन ज्या पद्धतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाते; त्याच धर्तीवर आता चंदीगड महानगरपालिकेच्या स्तरावर देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित घनकचरा व्यवस्थापन लवकरच साध्य केले जाणार आहे.

आजच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चंदीगड महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती सर्बजीत कौर, श्री. अनुप गुप्ता, चंदीगडच्या महानगरपालिका आयुक्त श्रीमती अनिंदता मित्रा, प्रमुख अभियंता श्री. एन. पी. शर्मा हे उपस्थित होते. तर त्यांच्यासमवेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या उपायुक्त डाॅक्टर संगीता हसनाळे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प) श्री. मिनेष पिंपळे, विशेष कार्य अधिकारी श्री. सुनील सरदार, अभियंता श्री. शैलेन्द्र काळे व श्री. अवधूत पुजारी यांनी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या विविध प्रकल्पांची व कामांची माहिती मान्यवर अतिथींना दिली.

चंदीगड महापालिकेतील मान्यवरांच्या आजच्या पाहणी दौऱ्याची सुरुवात कांजूरमार्ग क्षेपणभूमी येथून झाली. याठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, कच-यापासून खत निर्मिती, कचरा व्यवस्थापनात अत्याधुनिक व संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर इत्यादी बाबींची माहिती मान्यवरांनी घेतली. यानंतर मान्यवरांनी मुलुंड येथील क्षेपणभूमी येथे प्रगतीपथावर असलेल्या 'बायोमायनिंग' प्रकल्पास भेट देऊन तेथील कामांची माहिती घेतली.

..

आजच्या पाहणी दौऱ्याच्या अखेरीस चंदीगड महानगरपालिकेच्या मान्यवरांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन त्यांना पाहणी दौऱ्यादरम्यान अनुभवलेल्या व समजावून घेतलेल्या बाबींची माहिती दिली.


सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात