ताजी बातमी

 पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची ग्वाही*

गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन संपन्न


मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबईत विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. मुंबईसारख्या महानगरात दक्षिण उत्तर वाहतूक सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या तुलनेत पूर्व-पश्चिम भागांना वाहतूक सेवा सुविधा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे विविध वाहतूक पर्याय मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरीय प्रयत्न आणि अंमलबजावणी सातत्याने येत आहे. याच प्रयत्नांचा आणि अंमलबजावणीचा भाग म्हणून गोरेगांव आणि मुलुंड या दोन महत्त्वाच्या उपनगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला असून या प्रकल्पाअंतर्गत गोरेगाव परिसरातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन आज होत आहे. ही निश्चितच एक समाधानाची आणि आनंदाची बाब आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी काढले.

..

ते आज 'जी एम एल आर' प्रकल्पांतर्गत गोरेगाव परिसरातील उड्डाण पुलाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते. 

..

या कार्यक्रमाला खासदार श्री गजानन कीर्तिकर, आमदार श्री. रवींद्र वायकर, आमदार श्री. सुनील प्रभू, माजी उपमहापौर एडव्होकेट सुहास वाडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू, उपायुक्त (परिमंडळ ४) श्री. विजय बालमवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि मोठ्या संख्येने परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.

..

या कार्यक्रमादरम्यान बोलताना श्री. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला मुंबईकरांच्या कोविड लढ्याचा उल्लेख करीत कोविड प्रतिबंधात्मक लशीची मात्रा घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच मुंबईत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा उल्लेख करीत त्यांनी पर्यावरण पूरकतेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बस, वृक्षारोपण यासारख्या बाबींचा आवर्जून उल्लेख केला. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेद्वारे मुंबईला 'वृक्ष नगरी'चा बहुमान नुकताच प्राप्त झाला असल्याचे सांगत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले.

...

या कार्यक्रमादरम्यान बोलताना खासदार श्री. गजानन कीर्तिकर गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यामुळे जसा मुंबईतील नागरिकांना फायदा होणार आहे, तसाच विदर्भ कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांना देखील भविष्यात गाडी पकडण्यासाठी वळसा घालण्याची गरज पडणार नाही व तुलनेने कमी वेळात आपल्या गावी पोहोचता येईल; याचा आवर्जून उल्लेख केला. तर आमदार श्री सुनील प्रभू यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतानाच त्यामुळे नागरिकांना उपलब्ध झालेल्या विविध सेवा-सुविधांचा आवर्जून उल्लेख केला.

..

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविका दरम्यान त्यांनी 'गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प' या अंतर्गत प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलांची व एकंदरित प्रकल्पाची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले यांनी केले.

===


*गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील उड्डाणपूलाचे भूमीपूजन*


या अनुषंगाने प्रकल्पाचे महत्त्वाचे मुद्दे व ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :-


• 'गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्प' हा महानगरपालिकेने हाती घेतलेला महत्त्वाचा प्रकल्प असून या जोडरस्त्याने मुंबई उपनगरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा चौथा जोडरस्ता उपलब्ध होणार आहे. 


• सदर जोडरस्त्याची लांबी १२.२ किलोमीटर असून पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे.

..

• सदर जोडरस्ता ५ x ५ मार्गिकेचा असून या जोडरस्त्याच्या कामामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणा-या ४.७ किलोमीटर लांबीच्या १३ मीटर व्यासाच्या जोडबोगद्याचा व दादासाहेब फ़ाळके चित्रनगरीमधून जाणारा १.६० किलोमीटर लांबीच्या पेटी बोगदा आणि त्यांचे पोहोच रस्त्यांच्या बांधकामांचा समावेश आहे. सदर बोगदे ३ x ३ मार्गिकेचे आहेत.

..

• गोरेगाव बाजूकडील जोडरस्त्याचे ओबेराय मॉल ते दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात 'फिल्म सिटी' पर्यंतच्या २.८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम प्रगतिपथावर असून मुलुंड बाजूकडील तानसा पाईपलाईन ते पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शन पर्यंतच्या २.७ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि नाहूर रेल्वे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचेही काम प्रगतिपथावर आहे. ही कामे सन २०२२-२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.

..

• गोरेगांव-मुलुंड जोडरस्त्यावर होणारी संभाव्य वाहतूक विचारात घेऊन गोरेगांव पूर्व येथील दिंडोशी न्यायालयाजवळून रत्नागिरी हॉटेल चौकावरून जाणारा १.२९ किलोमीटर लांबीचा व ३  × ३ मार्गिकेचा उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. या कामांमध्ये दिंडोशी न्यायालयाजवळ पादचा-यांसाठी 'जीएमएलआर' रस्ता ओलांडण्याकरीता पादचारी पूल स्वयंचलित सरकत्या जिन्यासह प्रस्तावित आहे.

..

• या कामामध्ये मुलुंड (पश्चिम) खिंडीपाडा येथील गुरू गोविंद सिंग रस्ता, गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता आणि भांडूप जलशूद्धीकरण संकुलाचा रस्ता यांच्या चौकातील स्थानिक वाहतुकीसाठी उच्चस्तरीय चक्रीय मार्ग व या कामामध्ये खिंडीपाडा येथे पादचा-यांसाठी 'जीएमएलआर' रस्ता ओलांडण्याकरीता पादचारी पूल स्वयंचलित सरकत्या जिन्यासह प्रस्तावित आहे. 

..

• तानसा पाईपलाईन ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा ३ × ३ मार्गिकेचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. 

..

• डॉक्टर हेडगेवार चौक येथे १२० मीटर पूल हा 'केबल स्टे' स्वरुपाचा असून 'मुंबई मेट्रो-४' च्या खालच्या पातळीवर म्हणजे पहिल्या स्तरावर 'जीएमएलआर' उड्डाणपूल प्रस्तावित आहे. 

..

• या दोन उड्डाणपुलांचा कंत्राट खर्च ६६६.०६ कोटी इतका असून कामाचा कालावधी ३६ महिने आहे. ह्या दोन्ही पुलांचे बांधकाम, एक स्तंभावर पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रिटचे सेगमेंटल बॉक्स गर्डर वापरुन करण्यात येणार आहे. 

..

• या कामासाठी स्थायी समितीने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजीच्या ठराव क्रमांक- १६५२ अन्वये मान्यता दिली असून मे. एस. पी. सिंगला या कंत्राटदारास कार्यादेश देण्यात आला आहे.
सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात