ताजी बातमी

रस्ते, सार्वजनिक ठिकाणी झाडांभोवतीचे काँक्रिट, झाडांवरील जाहिरात फलक, खिळे, केबल्स काढण्यासाठी विशेष मोहीम


सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये देखील होणार सहभागी


पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वृक्षांचे संरक्षण, जतन, संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून मुंबईत दिनांक १८ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत वृक्ष संजीवनी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये यांचादेखील सहभाग राहणार आहे. 


वृक्ष संजीवनी मोहिमेत प्रामुख्याने मुंबई महानगरातील रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांभोवतीचे काँक्रीट काढणे, झाडांवरील जाहिरात फलक, खिळे, विद्युत तारा, केबल काढणे इत्यादी प्रकारची कामे केली जाणार आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे.


या मोहिमेबाबत माहिती देताना उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी सांगितले की, राष्‍ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, झाडांभोवती मोकळी जागा सोडणे अनिवार्य आहे. तसेच झाडांवर जाहिरात फलक, नामफलक, विद्युत तारा आढळल्यास ते काढणे आवश्‍यक आहे.

 त्यामुळे उद्यान विभागाच्‍या खातेअंतर्गत कर्मचाऱ्यांकडून दिनांक १८ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत ही मोहीम राबवली जाईल. महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्‍तरावरील सहाय्यक अभियंता (परिरक्षण) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांचाही यामध्ये सहभाग असेल. मुंबईतील स्‍थानिक सामाजिक संस्‍था, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत अशासकीय संस्‍था, शाळा, महाविद्यालये यांना सहभागी होण्‍यासाठी आवाहन करण्‍यात येईल, जेणेकरून या मोहिमेची व्याप्ती वाढून सामाजिक जनजागृती होईल आणि युवा पिढीमध्ये देखील पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचेल, असे श्री. परदेशी यांनी नमूद केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात