ताजी बातमी

जी/ दक्षिण विभागातील विविध विकास कामांचे राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तथा स्थानिक आमदार श्री. आदित्य ठाकरे यांनी आज (दिनांक १० एप्रिल २०२२) लोकार्पण व भूमिपूजन केले. आमदार श्री. सुनील शिंदे, माजी महापौर श्रीमती स्नेहल आंबेकर, माजी मंत्री श्री. सचिन अहिर, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष श्री. आशीष चेंबूरकर, जी / दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त श्री. शरद उघडे व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


वरळीमधील जी. के. मार्ग स्थित कै. श्रीमती सुनिता दत्ताजी नलावडे मनोरंजन मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले. सुमारे २ हजार ३६६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या मैदानाचे नूतनीकरण केल्याने विविध खेळांसाठी सुविधा निर्माण झाली आहे. योगा करण्यासाठी छत, खुल्या प्रेक्षागृहासाठी पायऱया, पदपथांची दुरुस्ती, गझेबो दुरुस्ती, भित्तीचित्रं, सुरक्षा रक्षक दालन, भिंतीवर चित्रं रंगवून सुशोभीकरण, वृक्षलागवड इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश करुन या मैदानाचे नूतनीकरण केले आहे. 


जी. के. मार्ग आणि दैनिक शिवनेर मार्गावर स्थित भगवान श्री. शांतिनाथ चौकाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण देखील श्री. ठाकरे यांनी केले. या सुधारित जंक्शनमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

यानंतर, हाजी अली जंक्शनच्या विकासासह सुशोभीकरण कामाचे भूमिपूजनही श्री. ठाकरे यांनी केले. म्युझिक थीम गार्डन, खुले प्रेक्षागृह (ऍम्पिथिएटर), ३ मीटर रुंदीचा पदपथ, लाला लजपतराय उद्यानाचा विकास व पट्टा उद्यान (स्ट्रीप गार्डन) या कामांचा प्रारंभ देखील यावेळी करण्यात आला.

बाबुराव पेंढारकर मार्गावर प्रामुख्याने श्वान व इतर पाळीव प्राण्यांसाठी निर्माण करण्यात येणारे पेट पार्क आणि सेंच्युरी प्लॉटवर बांधण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय क्रीडांगणाचे भूमिपूजनही श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. तसेच, सेनापती बापट मार्गावर सुरु असलेल्या पदपथ व रस्ता विकास कामांची देखील श्री. ठाकरे यांनी पाहणी केली.