ताजी बातमी

*दक्षिण मुंबईतील एन. एस. पाटकर मार्गालगत संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण*



गेल्या पावसाळ्यातील दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजीच्या अतिवृष्टी दरम्यान दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ जंक्शन परिसरातील व केम्स कॉर्नर जवळील एन. एस. पाटकर मार्गालगतचा टेकडी उताराचा भाग खचल्यानंतर सदर ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले होते. हे काम विक्रमी वेळेत म्हणजेच केवळ ६ महिन्यांच्या आत पूर्णत्वास गेले. या कामांचे लोकार्पण महाराष्ट्राचे मा. पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले. मुंबईच्या मा. महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवार, दिनांक २४ जून २०२१ रोजी हा लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

..

या कार्यक्रमाला स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, स्थानिक आमदार श्री. मंगलप्रभात लोढा, सी आणि डी विभागांच्या प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका श्रीमती जोत्स्ना मेहता यांच्यासह अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत गायकवाड आणि मान्यवर उपस्थित होते.

..

वरील तपशीलानुसार आज लोकार्पण करण्यात आलेल्या कामांबाबत मुद्देनिहाय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहेः-

..

१. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी अतिवृष्टी झाली होती. याच दिवशी महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील ‘मलबार हिल’ परिसरात तब्बल ३५७ मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. या अतिवृष्टीमुळे दक्षिण मुंबई परिसरातील बाबुलनाथ जंक्शन जवळ असणा-या एन. एस. पाटकर मार्गाला लागून असणारा टेकडीच्या उताराचा भाग ढासळला होता. यामुळे टेकडीच्या वरुन जाणारा बी. जी. खेर मार्ग देखील प्रभावीत होऊन धोकादायक झाल्याने सदर दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ बंद करण्यात आली होती.


२. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या नेतृत्वात एन. एस. पाटकर मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते खात्याद्वारे युद्ध स्तरावर हाती घेण्यात आले.


३. अतिवृष्टीमुळे टेकडीचा भाग खचल्यानंतर सुरुवातीला करण्यात आलेल्या कार्यवाही अंतर्गत मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थान (आय. आय. टी., मुंबई) यांच्या सहकार्याने  तज्ज्ञ समिती नेमून सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. सदर सल्लागारांच्या सुचनांनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.


४. सदर टेकडीच्या उतारालगत व एन. एस. पाटकर मार्गालगत मलबार हिलच्या बाधित भागाचे बळकटीकरण करणे, सदर ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे आणि रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधण्यासह रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे प्रत्यक्ष काम १ जानेवारी २०२१ पासून सुरु करण्यात आले. ज्यानंतर आता केवळ ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सदर काम पूर्ण करण्यात आले असून, आजपासून (दिनांक २४ जून २०२१) हा रस्ता पूर्ववत सुरु होत आहे.   


५. या कामांतर्गत ५ मीटर उंचीची व १६० मीटर लांब संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यात आले आहे. या संरक्षक भिंतीची स्थापत्तीय वैशिष्ट्य म्हणजे सदर भिंतीची जाडी ही खालच्या बाजूला ९०० मिली मीटर असून वरच्या बाजूला ३०० मिली मीटर इतकी आहे.


६. या भिंतीलगत असणा-या सुमारे ५५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे सदर रस्त्याच्या खाली १२०० मिली मीटर व्यासाची व सुमारे ५५० मीटर लांबीची पर्जन्य जलवाहिनी देखील टाकण्यात आली आहे.


७. या रस्त्याची रुंदी ही पूर्वी सुमारे २४ मीटर इतकी होती. जी वाढून आता २७ मीटर इतकी झाली आहे.


८. सदर कामामध्ये संरक्षक भिंत बांधणे, रस्त्याखाली पर्जन्य जलवाहिनी बांधणे आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, या प्रमुख कामांचा समावेश होता.


९. आजपासून एन. एस. पाटकर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात