ताजी बातमी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे यावर्षी मुंबई शहर बेटावरील २१ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या आगमनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेकरिता  मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी उद्यापासून दोन दिवसांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. 

       श्री. घोसाळकर, मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अरुण डोंगरे, संबंधित विभागातील उपमुख्य अभियंता व आवश्यकतेनुसार अधिकारी यांचे पथक दक्षिण मुंबईतील धोकादायक इमारतीना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. इमारतीची परिस्थिती लक्षात घेता तेथील भाडेकरू /रहिवाशांना आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण करण्याचा निर्णय देखील तात्काळ घेतला जाईल, अशी माहिती मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली. तसेच या  इमारतींतील भाडेकरू /रहिवाशांना मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करण्याचे आवाहन व सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत जागरूक देखील करण्यात येणार आहे. जेणेकरून अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. 

     या वर्षी मंडळाने जाहीर केलेल्या २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४६० निवासी व २५७ अनिवासी असे एकूण ७१७ रहिवासी / भाडेकरू आहेत. यापैकी १९३ निवासी भाडेकरू / रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत २० निवासी भाडेकरू /रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित २४७ निवासी भाडेकरू / रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.  

      पहिल्या दिवशी दहा इमारतींची पाहणी होणार असून दुसऱ्या दिवशी ११ इमारतींची पाहणी केली जाणार असल्याची माहिती देखील श्री. घोसाळकर यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात