ताजी बातमी

एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना, या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस कंपन्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक होतकरू तरुणांना या कंपन्या आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अलीकडेच भांडुपच्या ड्रीम्स मॉलमध्ये 'ओशन मीडिया अँड रिक्रुटमेंट कंपनी'च्या नावाने रोजगाराचे दुकान थाटलेल्या जाकीर अनिस अहमद याला मंगळवारी भांडुप पोलिसांनी अटक केली. या कंपनीच्या नावे जाकीरने जवळपास पन्नासहून अधिक तरुणांना नोकरीचे आमिष देत प्रत्येकी दीड ते दोन लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे.

मागील वर्षी रूपेश मोरे या युवकाने इंग्रजी वृत्तपत्रातील जाहिरात वाचून नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने या कंपनीच्या ड्रीम्स मॉलमधील कार्यालयाशी संपर्क साधला. सुरुवातीला कार्यालयातील वातावरण, भव्यता आणि स्टाफ पाहून आपली फसवणूक होईल असा कुठलाही विचार त्याच्या मनाला शिवला नाही. त्यानंतर नोकरीची हमी थेट १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून मिळत असल्याने सर्वच शंका दूर झाल्या. स्टॅम्पपेपरच्या याच दिखाव्याला रूपेशसारखे अनेक तरुण-तरुणी भुलले आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकले. कंपनीकडून प्रोसेस फी, डिपॉजिटच्या नावाखाली लाखो रुपये उकळण्यात आले. त्यात लेखी हमी मिळाल्याने तरुणांनी (अस्तित्त्वात नसलेल्या कंपन्यांमध्ये) रुजू होण्यासाठी दिलेल्या मुदतीपर्यंत थांबण्याचे ठरवले. मात्र, दिलेल्या मुदतीचा काळ जाकीरकडून हळूहळू पुढे ढकलण्यात येत होता. अखेर या 'तारीख पे तारीख'ला कंटाळल्यानंतर यापैकी काही तरुणांना फसवणूक झाल्याचा संशय येऊ लागला. त्यामुळे अनेक तरुणांनी मागील काही दिवसांत या कार्यालयाला भेट देण्याचा प्रयत्न केला, मात्र आठवडाभर बंद कार्यालय पाहून आपली फसवणूक झाल्याचे तरुणांना कळले. अखेर सर्व तरुणांनी एकत्र येऊन भांडुप पोलिस ठाण्यात जाकीर अहमदच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे, यामध्ये बेंगळुरूमधील दोन, गोव्यामधील एक तर ग्रामीण भागातील अनेक तरुणांचाही समावेश आहे. हे तरुण मागील अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये नोकरी लागेल या अपेक्षेने मुंबईच्या खेपा मारत आहेत. तरुणांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत भांडुप पोलिसांकडून जाकीर अहमदला मंगळवारी, ३० ऑक्टोबरला अटक करून न्यायालयात दाखल करण्यात आले. जाकीरला नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भांडुप पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धनराज तायडे यांनी दिली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात