ताजी बातमी

कोठडी मृत्यूप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रेमी युगुलावर गुन्हा नोंदवला. पोलीस ठाण्यात येण्यापूर्वी मृत विजय सिंह या तरुणाला युगुलाने बेदम मारहाण केली होती, असे पोलिसांनी जाहीर केले. त्यामुळे स्वत:वरील बालंट युगुलावर टाकून पोलीस मोकळे झाले, असा आरोप करण्यात येत आहे.

दशरथ देवेंद्र आणि आफरीन अशा दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटना घडली तेव्हा हे दोघे वडाळा ट्रक टर्मिनल येथील एमएमआरडीए कम्पाऊंड परिसरात बसले होते. विजयच्या दुचाकीचा प्रकाश या दोघांवर पडला आणि शाब्दिक खटका उडाला. पोलीस तेथे पोहोचले त्याआधी देवेंद्र आणि आफरीन यांनी विजयला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे त्याच्या छातीला मुका मार बसला, असा दावा पोलिसांनी केला. अद्याप दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली नाही.

पोलीस तेथे पोहोचले तेव्हा आफरीनने विजय आणि त्याच्या दोन मित्रांवर छेडछाडीचा खोटा आळ घेतला. त्यामुळेच विजय आणि त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

मात्र पोलिसांचा हा दावा विजयचे कुटुंबीय आणि न्याय मागणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पटलेला नाही. पोलिसांनीही विजयला मारहाण केली. तसेच पोलीस ठाण्यात विजयची प्रकृती खालावल्यावर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

विशेष म्हणजे मृत विजयने छातीत दुखू लागल्याची तक्रार करताच पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी विजयच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेच, पण त्याला साधे पाणीही उपलब्ध करून दिले नाही. विजयचा गुन्हा काय या प्रश्नावर पोलीस निरुत्तर होते. पोलीस त्याची भेटही घेऊ देत नव्हते. वारंवार विचारणा केल्यावर पोलिसांनी कुत्सितपणे तुमची दिवाळी इथेच साजरी करतो, असा टोमणा मारत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली, असा आरोप मृत विजयची आई कंचन सिंह यांनी केला. बुधवारीही कुटुंबीयांनी निलंबित पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवून बडतर्फ करण्याची मागणी केली.

प्रेमी युगुलाविरोधात दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी मृत विजय सिंह याच्या कुटुंबाला धमक्या मिळाल्याचा दावा ॅड. विनय नायर यांनी केला. ॅड. नायर हे सिंह कुटुंबाच्या वतीने काम पाहात आहेत. दोषी पोलिसांविरोधात आठवडय़ाभरात गुन्हा दाखल झाला नाही तर उच्च न्यायालयात याचिका करू, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात