कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसमध्ये अग्नितांडव! 65 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
कराची: पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ३० हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळ एक्स्प्रेसला आग लागल्याचं सांगितलं जात आहे. स्फोटानंतर एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आग
सिलेंडरच्या स्फोटामुळे रेल्वेत आग लागली. दुर्घटनेवेळी प्रवासी झोपले असल्यामुळे काही कळण्याच्या आतच आग वेगाने भडकत गेली. सध्या या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आली आहे. तर काही रेल्वे दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. 'डॉन' ने दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख राशिद यांनी माहिती दिली.
ट्रेनला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. तर रेल्वेमध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे. जखमींवर मुल्तानमधील बीवीएच बहावलपूर, पाकिस्तान-इटालियन मॉडर्न बर्न सेंटर इथे उपचार सुरू आहेत.