ताजी बातमी

दोन्ही काठांलगत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे पाणी पसरण्यास वाव मिळाल्याने तसेच मुखाजवळ सुरू असलेल्या विकासकामांमुळे मिठी नदीने बुधवारी पावसानंतर रुद्रावतार घेतल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करू लागले आहेत. दुसरीकडे, पालिकेच्या अधिकाऱ्यांनीही मिठीच्या समुद्राजवळच्या मुखाची रुंदी पात्रापेक्षा निम्मी असल्याने पाण्याचा निचरा झाला नसल्याची बाब मान्य केली आहे. मिठी नदीतून पाण्याचा निचरा का होऊ शकला नाही, याच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

२६ जुलै २००५ सारख्या जलप्रलयाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे बुधवारी निर्माण झाली होती. कोसळणारा पाऊस आणि दुथडी भरून वाहणारी मिठी नदी यामुळे कुर्ला येथील क्रांतीनगर, बामण दाया पाडा जलमय झाला. तर कलानगर आणि आसपासच्या परिसरातही पाणी साचले. बराच वेळ साचलेल्या पाण्याचा निचराच होत नव्हता. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामातोश्रीनिवासस्थानाच्या उंबरठय़ापर्यंत पाणी पोहोचले आणि यंत्रणांची एकच पळापळ झाली.

पालिका प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून मिठीच्या पाण्याचा निचरा का होऊ शकला नाही याचा शोध घेण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे मिठी नदीमधील पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, असे कारण सांगितले जात आहे. मात्र वांद्रे-कुर्ला भागात मिठीचे पात्र २०० मीटर रुंद आहे, तर समुद्राला जाऊन मिळणाऱ्या मिठीच्या मुखाची रुंदी साधारण १०० मीटर आहे. त्यामुळे २०० मीटर क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्या पाण्याला मुखातून समुद्रात जाण्यासाठी पाहिजे तेवढा वाव मिळत नाही. त्यामुळे कदाचित हा प्रकार घडला असावा. याचा शोध घेण्याची गरज आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मात्र, याला पालिका जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मिठीच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाचे पाणी पसरण्यास नदीमध्ये जागाच नाही. नदीच्या काठावर संरक्षक भिंत बांधून जमीन निर्माण करण्याचे काम पालिकेने केले आहे. संरक्षक भिंती आणि आसपास सुरू असलेल्या विकासकामांमुळे मिठीमधील पाणी पसरण्यास वाव राहिलेला नाही, असा आरोप या परिसरातील समाजसेवक डी. स्टॅलिन यांनी केला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात