ताजी बातमी

मोकळ्या पूर्व मुक्त मार्गावरून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे आणि आयत्या वेळी वाहनाची दिशा बदलणे एका वृद्ध प्रवाशाच्या जिवावर बेतले. वाहनचालकाच्या चुकीमुळे बुधवारी पूर्वमुक्त मार्गावरील बोगद्याजवळ अपघात घडला. त्यात चालकाची टॅक्सी पलटी झाली.

आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुब्रमण्यम एस अय्यर(७२) यांनी बुधवारी दुपारी दक्षिण मुंबईतून वाशीला जाण्यासाठी उबर टॅक्सी केली. चालकाने वाशीला जाण्यासाठी बोगद्यापुढील उड्डाणपुलाशेजारून पांजरापोळ चौकाकडे जाणे अपेक्षित होते. मात्र पुलाशेजारील रस्त्यावर वाहतूक खोळंबा पाहून चालकाने आयत्यावेळी टॅक्सी उड्डाणपुलाच्या दिशेने वळवली. त्या गडबडीत चालकाचा टॅक्सीवरील ताबा सुटला आणि ती पुढे चाललेल्या वाहनावर आदळून पलटी झाली. धडकेमुळे पुढील वाहनही अनियंत्रित झाले. या वाहनात दिल्लीचे जुनेजा कुटुंबीय होते. गणेशोत्सवासाठी मुंबईत आलेल्या जुनेजा कुटुंबाने अन्य वाहनचालकांच्या मदतीने पलटी झालेली उबर टॅक्सी सरळ करून त्यातील चालक आणि प्रवासी अय्यर यांना बाहेर काढले.

चालक सोनुकुमार यादव याला ताब्यात घेत पोलिसांनी अय्यर यांना गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अय्यर यांना उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी यादव याला अटक केली. यादव पूर्व मुक्त मार्गावरून मर्यादेपेक्षा जास्त वेगाने टॅक्सी चालवत होता. उड्डापुलाच्या अलीकडे आयत्या वेळी त्याने टॅक्सीची दिशा बदलल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात