ताजी बातमी

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प’हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करु, असा विश्वास व्यक्त करत या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी आज दिली. ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ‘महारेलच्या’ वतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. 


या बैठकीला महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात,  कामगारमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील,  परिवहनमंत्री ना. अनिल परब,  परिवहन राज्यमंत्री ना. सतेज पाटील,  खासदार डॉ. अमोल कोल्हे,  खासदार हेमंत गोडसे,  आमदार दिलीप मोहिते-पाटील,  आमदार अशोक पवार,  आमदार चेतन तुपे,  आमदार सदाशिव लोखंडे,  आमदार डॉ. किरण लोहमटे, आमदार सरोज आहिरे आदी लोकप्रतिनिधी तसेच महारेलचे महाव्यवस्थापक,  वित्त,  नियोजन,  महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हिसीद्वारे उपस्थित होते. 


या प्रकल्पामुळे पुणे,  अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर  प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे, ना. अजित पवार म्हणाले. अत्यंत कमी खर्चात हा प्रकल्प पूर्ण होणार असून पुणे - नाशिक हे अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापले जाईल असेही ना. अजित पवार म्हणाले.

 

सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार असून या मार्गावरील रेल्वे स्थानकांत व्यवसायासाठी स्टॉल देताना बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे  शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार असल्याचे ना. अजित पवार म्हणाले.  या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात